साक्षर जनता ! भूषण भारता!!

जागतिक साक्षरता दिन !

जागतिक साक्षरता दिन !
—————————————

साक्षर जनता ! भूषण भारता!!
—————————————

मित्रांनो आज जागतिक साक्षरता दिन! साक्षरता दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! साक्षरतेचे महत्व थोडक्यात जाणून घेऊ या. आठ सप्टेंबर रोजी जगभरात साक्षरता दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. समाज जागृती करणे, समाजातील अज्ञान, अंधकार दूर करणे, संपूर्ण समाज साक्षर करणे, सुसंस्कारित करणे, समाजातील अंधश्रद्धा दूर करणे, समाजातील बेरोजगारी दूर करणे, लोकसंख्या विषयी जागृत करणे व लोकसंख्येला आळा घालणे, आपली मुले शाळेत घालणे, मुलांना ज्ञान, विज्ञान, कला क्रीडा संस्कृती, तंत्रज्ञान, याविषयी जागरूक करणे, आपण कोण आहोत.? समाजात आपले काय स्थान आहे? आपले कर्तव्य व आपली जबाबदारी काय आहे? याची जाणीव करून देणे, जनजागृती करणे या काही महत्त्वाच्या उद्दिष्टासाठी जागतिक साक्षरता दिन साजरा केला जातो.

साक्षर जनता भूषण भारता.!” देशातील सर्व जनता साक्षर असणे हे कधीही देशासाठी भूषण आहे. माणसाच्या जीवनात साक्षरतेला खूप महत्त्वाचे स्थान आहे. साक्षरता हे जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे. साक्षरता जीवनाला दिशा देते, जीवनाची दिशा बदलते, दिशाहीन माणसाला रस्ता दाखवण्याचे कार्य करते. साक्षरता म्हणजे साधारणपणे अक्षरांची ओळख होणे. अक्षरे, मुळाक्षरे वाचता येणे, प्रत्येक वर्णाचा उच्चार स्पष्ट, व्यवस्थित, आरोह अरोहा नुसार करता येणे म्हणजेच अक्षर ज्ञान होणे. अक्षरे सरळ सरळ वाचता येणे व लिहिता येणे यालाच साधारणपणे साक्षर होणे असे म्हणतात. आणि साक्षर झालेली जनता म्हणजेच देशाचा अभिमान होय. भारत सरकार देशातील संपूर्ण नागरिकांना साक्षर करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करीत असते. देशातील तळागाळातील लोकांना साक्षर करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवते. साक्षरता अभियान, असेल, महिला साक्षरता अभियान असेल, रात्र शाळा असतील, वृद्धांसाठी शाळा असतील, तळागाळातील घटकापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे व प्रत्येक घटक साक्षर झाला पाहिजे हा या पाठीमागचा उद्देश आहे. साक्षरता दिन साजरा करण्याचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशातील सर्व लोकांना लिहिता वाचता आले पाहिजे. साक्षर म्हणजे फक्त लिहिता वाचता येणे एवढेच मर्यादित नाही तर ते काय लिहिलेले आहे, व का लिहिले आहे, याचा अर्थही कळला पाहिजे. निरक्षर म्हणजे ज्यांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही, अक्षरांची ओळख झालेली नाही, अक्षरांचा उच्चार करता येत नाही, त्यांना निव्वळ निरक्षर म्हणून संबोधले जाते! जशी जशी लोकसंख्या वाढते त्याच प्रमाणात बेरोजगारी वाढीस लागते. लोकसंख्या वाढीचा परिणाम साक्षरतेवर होतो.! साक्षर झालेला माणूस जगात स्वावलंबी व स्वाभिमानी होतो! पण निरक्षर व्यक्तीला दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. परावलंबी जीवन जगावे लागते.
त्यांचे जीवन आंधळ्या व्यक्ती सारखे होते. शिक्षणाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. म्हणूनच म्हटले जाते की, “ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे” देवाने माणसाला दोन डोळे दिलेले आहेत पण तिसरा डोळा हा आपणाला स्वतः निर्माण करावयाचा आहे. तो म्हणजे ज्ञान आणि जोपर्यंत माणूस साक्षर होत नाही तोपर्यंत त्याला ज्ञान मिळत नाही. आधुनिक काळात वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे, विज्ञान तंत्रज्ञानाच्या या युगात वाचनाकडे कुणाचेही लक्ष नाही. “परंतु वाचाल तर वाचाल!” समाजातील तळागाळातील लोकांना वाचता आले पाहिजे, साक्षर झाले पाहिजे, महिला असेल, पुरुष असेल सर्वांना वाचता व लिहिता आले पाहिजे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. अडाणी व अज्ञानी माणसापर्यंत प्रकाशाची ही ज्योत पोहोचली पाहिजे. “दीपसे दीप जलायंगे, देश को साक्षर बनायेंगे!” अज्ञानी लोकांना वेळोवेळी फसवले जाते. त्यांचा वापर म्हणावा तसा केला जातो. सरकारी नोकरी असेल, कार्यालय असेल, कंपनी असेल, समाजातील इतर प्रत्येक ठिकाणी अशा लोकांवर अन्याय होतो. निरक्षर लोकांना कुठेही वाव मिळत नाही. म्हणतात ना” ज्ञान नाही तर मानही नाही!

“म्हणून प्रत्येकाने साक्षर झाले पाहिजे. पूर्वीचा काळ हा वेगळा होता, त्या तुलनेत आजचा काळ हा खूप वेगळा आहे! परिवर्तन संसार का नियम है अगदी त्याचप्रमाणे काळाचे परिवर्तन झाले. समाजाचे परिवर्तन झाले. ज्ञान विज्ञानाचे परिवर्तन झाले. तेव्हा काळा बरोबर चालायचे असेल तर सर्वांना साक्षर झालेच पाहिजे. साक्षर जनता भूषण भारता! फक्त कागदावर साक्षरतेची टक्केवारी वाढवून चालणार नाही!! त्यासाठी शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येक घटकाने जबाबदारीने आपला परिसर, आपला समाज, आपली शाळा, आपले विद्यार्थी, अशा प्रत्येक घटकाला साक्षर करणे गरजेचे आहे. या उद्देशातूनच चावडी वाचन हा प्रकार पुढे आला. आजही आपण प्रत्येक शाळा मधून पाहतो बऱ्याच विद्यार्थ्यांना वाचन करता येत नाही!! मुलांना वाचता का येत नाही ? हा खूप गंभीर प्रश्न सर्वांच्या समोर आहे! त्याचे उत्तर आपल्याला सरळ सरळ देता येईल. जर मुळामध्ये त्या विद्यार्थ्यांची मुळाक्षरेच पक्की झालेली नसतील. अक्षरांची ओळख झालेली नसेल, अशा मुलांचा पायाच पक्का नसेल, तर हळूहळू पुढील वर्गामध्ये त्यांना अडचणी निर्माण होतात. वाचनामध्ये समस्या निर्माण होतात व अशा अर्धवट समजलेल्या मुलांना पुढील अभ्यासाची भीती वाटू लागते! त्यांचा आत्मविश्वास खचतो, म्हणून बाल वर्गातील त्यांचा पाया हा भक्कम झाला पाहिजे. अक्षरज्ञान असेल, मुळाक्षरांची माहिती असेल, एक एक अक्षर वाचन असेल, लेखन असेल, त्या शब्दांचा उच्चार असेल, काना असेल, मात्रा असेल, अनुस्वार, असेल, वेलांटी असेल, विराम चिन्ह असतील, या सर्वांचा पाया पक्का झाला पाहिजे तर तो विद्यार्थी चांगल्या प्रकारे वाचन करू शकतो व त्याचे वाचनावर प्रेम निर्माण होईल!! फक्त शाळेतच शिक्षकांनी शिकवून तो पूर्णपणे साक्षर होणार नाही. हेही सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने जबाबदारीने त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे तरच साक्षरतेचे प्रमाण वाढीस लागेल. आणि खऱ्या अर्थाने साक्षरता दिन साजरा केल्याचे सार्थक ठरेल असे वाटते.

देविदास पांचाळ सर सैनिक स्कूल, तुळजापूर, जिल्हा धाराशिव.

X