शिक्षक -दिन विशेष

शिक्षक : समाजाचा एक
—————————————
सामर्थ्यशाली घटक!
—————————————

पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त – 
—————————————

मित्रांनो, आज पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. त्यांच्या जयंतीनिमित्त या महामानवास कोटी कोटी विनम्र अभिवादन! आजचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने सर्वप्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! आज पाच सप्टेंबर भारताचे महान शिक्षक, थोर तत्त्वज्ञ, विचारक, अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस! एक शिक्षक ते भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती या पदापर्यंत पोहोचण्याचा मान महान शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी मिळवला! त्यांच्या कार्यापासून, त्यांच्या चरित्रामधून सर्वांना प्रेरणा मिळत राहील. आज शिक्षक दिना बद्दल, शिक्षकांबद्दल थोडसं- – – मित्रांनो, शिक्षक म्हणजे गुरु, शिक्षक म्हणजे मार्गदर्शक, शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांना घडवणारे. एखाद्या शिल्पा प्रमाणे आकार देण्याचं काम शिक्षक करतात. पूर्वी शिक्षकांना कुंभाराचे उदाहरण देत असत. ज्याप्रमाणे कुंभार चिखलापासून वेगवेगळ्या आकारांच्या वस्तू बनवत असत. मूर्ती बनवत असत. अगदी त्याचप्रमाणे शिक्षक आपल्या अनुभवातून, आपल्या ज्ञानातून, आपल्या विचारातून, आपल्या कृतीतून, आपल्या कला गुण कौशल्यातून विद्यार्थ्यांना सतत घडवत असतो. सातत्यपूर्ण घडवणे व सातत्यपूर्ण घडणे ही प्रक्रिया निरंतर चालू असते. शिक्षक व विद्यार्थी यामधील नाते अत्यंत पवित्र व कोमल स्वरूपाचे असते. शिक्षकांनी सांगितलेला शब्द ना शब्द विद्यार्थ्यांच्या मनपटलावर कोरला जातो! विद्यार्थ्यांच्या बालपणीच शिक्षकाकडून चांगले संस्कार घडवले जातात. लहान मुलांच्या कोऱ्या पाटीवर अ आ पासून ते पूर्ण भाषण संभाषण वक्तृत्व कला संपादन करण्यापर्यंत शिक्षक त्यांना पोहोचवतात. भाषेमधील उच्चार, असेल, भाषेमधील शब्दांचा चढ उतार असेल, वेगवेगळ्या शब्दावरील प्रभुत्व असेल, एखादी कविता असेल, कवितेची चाल असेल, कवितेचा अर्थ बोध असेल, कवितेतील व्याकरण असेल, कवितेतील अलंकार असेल, कवितेतील भाव असेल, तो मुलांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं कार्य शिक्षक करतात. साधारणपणे विचार केला तर शिक्षक आपल्या अंतकरणातून समोर बसलेल्या छोट्या छोट्या बालकांना ज्ञानदान करण्याचे कार्य करतात. ज्ञानदान करण्यासाठी दोन घटक महत्त्वपूर्ण असतात. एक शिकवणारा आणि दुसरा शिकणारा. शिकणाऱ्याची जर मनातून तीव्र इच्छा असेल, तळमळ असेल, तयारी असेल, मानसिकता असेल तर तो कुठलाही विषय अगदी सहजतेने आत्मसात करू शकतो. शिक्षकांनी शिकवलेले सर्व ज्ञान तो आत्मसात करू शकतो. यात कुठलीही शंका नाही ज्या मुलांना अभ्यासात गोडी वाटत नाही, वाचनात रस वाटत, नाही लेखनात आवड नाही अशा विद्यार्थ्यांसाठी कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी थोडा विलंब लागतो. कालावधी लागतो. शाळा म्हणजे सरस्वतीचे पवित्र मंदिर असते. या सरस्वतीच्या मंदिरचा पुजारी म्हणून शिक्षक कार्य करतात. आपले कर्तव्य बजावत असतात. शिक्षक म्हणजे गुरु, शिक्षक म्हणजे मार्गदर्शक, शिक्षक म्हणजे मित्र, सखा विद्यार्थ्याला प्रेमाने अवघड गोष्ट सोपी करून त्याच्या मनात उतरवणारा तो शिक्षक! ज्याच्याकडे शिस्त, क्षमता व कर्तव्याची जबाबदारी असते तो खरा शिक्षक. आपण थोडासा विचार केला तर लहान वयातच मुलांना शाळेत पाठवले जाते. अगदी लहानपणापासून त्या मुलाच्या मनपटलावर शिक्षकांची छाप पडते. शिक्षकांची भाषा असेल, शिक्षकांचे राहणीमान असेल, शिक्षकांची केशभूषा वेशभूषा असेल, शिक्षकांची वाणी असेल, शिक्षकांचे कला कौशल्य असेल, शिक्षकांचे शिकवण्याचे कौशल्य असेल, या सर्वांचा खोलवर परिणाम विद्यार्थ्यांच्या मनपटलावर होतो. व दिवसेंदिवस त्यात वाढ होत जाते व तो हळूहळू घडत जातो. त्याची जडणघडण होते. मात्र हृदयी साने गुरुजी आपल्या प्रेमळ स्वभावामुळे घराघरात पोहोचले. त्यांच्या श्यामची आई संस्काराच्या रूपाने भारतीयांच्या मनामनात पोहोचलि आणि साने गुरुजी केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये त्यांच्या संस्काराचा अमूल्य ठेवा पोहोचला. आजही तंत्रज्ञानाच्या युगात सर्वांना श्यामची आई संस्कार रूपाने प्राप्त होत आहे! त्याचबरोबर विद्यार्थी हा वर्गात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सोबत मिळून मिसळून तो एकमेकांकडून शिकत असतो. शिक्षक हा समाज घडवणारा कलावंत असतो. शिक्षक हा समाजाचा मूळ घटक आहे. गाभा घटक आहे. शिक्षक हा समाजाचा सामर्थ्यशाली घटक आहे! कारण वर्गाच्या चार भिंतीच्या आत तो राष्ट्राची उभारणी करतो. राष्ट्र घडवण्याचे अत्यंत मोलाचे कार्य करत असतो. देशाचा इतिहास असेल, देशाचा भूगोल असेल, देशाची संस्कृती असेल, देशाची परंपरा असेल, देशातील सण, उत्सव असतील, या सर्वांची मूलभूत माहिती शिक्षक विद्यार्थ्यांना देतात, सन का साजरे केले जातात? त्या पाठी मागील उद्देश काय आहे? देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास असेल, जगातील विविध ऐतिहासिक घटना असतील, देशातील महापुरुष त्यांचे चरित्र, जगातील महापुरुष त्यांचे चरित्र, त्यांचे कार्य त्यांनी पार पाडलेली कर्तव्य जबाबदारी या सगळ्या गोष्टीचे ज्ञान शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना देत असतात. आपण कोण आहोत? आपल्याला काय करायचे आहे? आपले कर्तव्य काय आहे? भविष्यात आपल्याला काय बनायचं आहे? याची दिशा देणारे योग्य मार्गदर्शन करणारे गुरु म्हणजे शिक्षक होय. वर्गामध्ये प्रत्येक स्तरातून आलेला विद्यार्थी असतात. समाजाच्या प्रत्येक स्तरातून वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या भाषा बोलणारा, वेगवेगळ्या पर्यावरणातून वातावरणातून विद्यार्थी आलेले असतात. त्यांची भाषा, त्यांची बोली, त्यांची वेशभूषा ही वेगवेगळी असते. त्याचबरोबर प्रत्येकाची मानसिकता, प्रत्येकाची बुद्धिमत्ता, प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता, प्रत्येकाची विचाराची उंची ही वेगवेगळी असते. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याची ग्रहण क्षमता ही सुद्धा वेगवेगळी असते. विद्यार्थ्यांच्या ग्रहण क्षमतेवर आकलन क्षमतेवर त्याचा अभ्यास, त्याची प्रगती अवलंबून असते., फक्त मार्काची टक्केवारी बघून आपण तो विद्यार्थी हुशार किंवा साधारण असा निष्कर्ष काढतो. परंतु हा निष्कर्ष किती बरोबर आहे. अभ्यास करण्यापलीकडे जाऊन विचार केला तर विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण, कला कौशल्य लपलेले असतात. सुप्त अवस्थेत असतात. या कलागुणांना वाव देण्याचे काम या कलागुणांना बाहेर आणण्याचे काम शिक्षक करत असतात. विद्यार्थ्यांना बोलण्यासाठी, कृती करण्यासाठी, उपक्रम करण्यासाठी, चित्रकला, संगीत, गीत गायन करण्यासाठी, एखादी कला सादर करण्यासाठी प्रेरित करतात. उत्साहीत करतात व त्याला सहभागी करून घेतात. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी शिक्षक हे आपापली जबाबदारी पार पाडण्याचे कार्य करतात. आपले कर्तव्य जबाबदारीने पूर्ण करण्याचे कार्य करतात मग ते समाजातील कुठलेही कार्य असो. आधुनिक काळात तंत्रज्ञान विकसित झाले, तंत्रज्ञानाने शिक्षण क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली व सर्व अध्ययन अध्यापन ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले परंतु अशा या धावपळीत खरा शिक्षक हा बाजूलाच राहिला. मनमिळाऊ, प्रेमळ, विद्यार्थ्यांना समजून घेणारा, विद्यार्थ्यांना समजून सांगणारा त्याला काय पाहिजे आहे हे ओळखणारा व त्याला योग्य उपचार करणारा हा शिक्षक. आधुनिक काळात तंत्रज्ञानाने बाजूला सरला असेच आपल्याला म्हणावे लागेल. विज्ञान तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी शिक्षक हे शिक्षकच असतात. त्यांचे स्थान अढळ आहे. पुनश्च एकदा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन व सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! धन्यवाद

लेखक
—————————————
श्री पांचाळ देविदास श्रीनिवास राव सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबा

X