नवीन वर्ष, नवे संकल्प - नवीन हे वर्ष सुखाचे जावो .!

नवीन वर्ष, नवे संकल्प – नवीन हे वर्ष सुखाचे जावो !
—————————————
करू या संकल्प नवीन वर्षाचा–
—————————————

मित्रांनो, दररोज चा दिवस येतो आणि जातो सर्वसामान्यांसाठी आपल्या दररोजच्या कामात दिवस कसा जातो हे कळतच नाही. दिवसा मागून दिवस जातात महिने जातात आणि वर्षही जातात बघा ना बघता बघता जुने वर्ष संपले आणि नवीन वर्षाला सुरुवात झाली. जुन्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत ! करण्यासाठी हा वर्षातला शेवटचा महिना आणि त्यातला हा शेवटचा दिवस वर्षभरातला लेखाजोखा आपल्यासमोर ठेवा आणि वर्षभरात आपण काय चांगले काम केलेले आहे व काय आपल्या हातून वाईट घडलेले आहे याचा अभ्यास करा व नवीन वर्षात सर्व दुर्गुण बाजूला टाकून द्या. जीवनातला प्रत्येक दिवस हा नव्याने येतो. नवीन पहाट, नवीन सूर्य, नवीन चंद्र, नवीन निसर्ग, नवीन विचार, नवीन कल्पना घेऊन नवीन वर्ष येत असतो.

 येणारे प्रत्येक वर्ष हे नवीन असते आणि जाताना मात्र जुने होऊन जाते. गेलेलं वर्ष हे कसं गेलं हे आपल्याला कळलंच नाही. जसे की माणसाचा जन्म होतो, लहान बाळ ही मी लवकरात लवकर मोठा कसा होईल याची वाट पहात असते, नवनवीन गोष्टी, घडामोडी, नवीन माणसं, यांच्याशी ओळख करीत असते. आपला परिवार असेल, आप कुटुंब यांच्याशी सर्वप्रथम घट्ट ओळख करते. त्यानंतर मग बाहेरील व्यक्ती, शेजारीपाजारी यांची ओळख होते. प्रत्येक दिवस आणि प्रत्येक व्यक्ती त्याला नवीन असते. नवीन व्यक्ती जवळ गेले की, ते प्रथम रडतच असते. परंतु नंतर सतत बघितल्यामुळे सवयीमुळे मात्र ते रडणं थांबवते. अगदी तसेच वर्ष येतात असे वर्ष निघून जातात आपण मात्र प्रत्येक पुढील वर्ष, पुढील काळ, पुढचा दिवस, येण्याची वाट बघत आलेला दिवस घालवत असतो. निसर्गाचे वेळापत्रक हे कधीही न बदलणारे व कधीही न संपणारे असते. सतत क्रिया घडत असतात.. सतत क्रिया चालूच असतात. सूर्य उगवतो सकाळ होते, दुपार होते आणि संध्याकाळही होते. पुन्हा नवीन दिवस उगवतो आणि आपण आपल्या नित्य कामाला लागतो.

सूर्य उगवतो, पक्षी किलबिल करतात, वारे वाहतात, नद्या वाहतात, मोटार गाड्या धावतात, रेल्वे, विमान, धावतात माणसे धावायाला लागतात. आपण मात्र या सगळ्या कामांमध्ये गुंतून जातो. जुन्या वर्षाने काय दिले याचा हिशोब करीत बसतो. किती फायदा झाला? काय काम केले? आपण किती घडलो बिघडलो? दुसऱ्याला किती घडवलं. नवीन वर्षात आपण सर्वांना काही तरी संकल्प केला पाहिजे. हल्ली लोक रस्त्याने सुद्धा नीट जात नाहीत. काहींना रस्त्याचे व वाहतुकीचे नियम माहिती नाहीत . काही लोकांना रस्त्याचे नियम पाळा म्हणून सारखे सांगावे लागते. रस्त्यावरून भरताव गाड्या चालवतात आणि आपल्याबरोबरच दुसऱ्याचही जीव संकटात आणतात अशा तरुणाईने आपल्या अशा वर्तनाला आळा घातला पाहिजे. व वाहतुकीच्या नियमाचे काटे कोरपणे पालन केलेच पाहिजे. जेणेकरून होणारे अपघात टळतील व शेकडो लोकांचे प्राण आपल्यामुळे वाचतील प्रथमतः हा संकल्प सर्वांनीच करणे गरजेचे आहे. नव्हे नव्हे केलाच पाहिजे! आरोग्य ही संपत्ती आहे. “आरोग्य सुदृढ राहणे म्हणजेच खरी श्रीमंती आहे, ही श्रीमंती जपली पाहिजे.” यासाठी सर्वांनी पहाटेचा सूर्योदय दररोज पाहिलाच पाहिजे. नित्यनेमाने पहाटे फिरायला जाणे, व्यायाम करणे, आळशी न बनता कार्यतत्पर होणे, वेळेच्या वेळी सर्व कामे करणे, आपल्यातील लोकांनी सांगितलेले दुर्गुण कमी करण्याचा निश्चय करणे, दुर्गुण व्यसन, दूर करणे सोडून देणे. शुद्ध आहार व सात्विक आहारच घेणे. पालेभाज्या व फळे खाणे. आपल्या मुलाबाळांकडे लक्ष देणे त्यांच्या शिक्षणाकडे व त्यांना सुसंस्कारित करणे.

आपले कर्तव्य व आपली जबाबदारी पार पाडणे. धूम्रपान न करणे व आरोग्यास घातक, समाजासाठी घातक ठरणाऱ्या गोष्टीला आळा घालणे. सामाजिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे, सार्वजनिक मालमत्ता आपली समजून त्याचे संरक्षण करणे, गड, किल्ले, बाग बगीचा, स्वच्छता व त्याचा सांभाळ करणे. आपल्या देशाचा गौरव होईल, मानसन्मान होईल असे कार्य करीत राहणे अशा कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. या सगळ्या गोष्टी करण्याला पैसे लागत नाहीत. फक्त इच्छाशक्ती लागते. फक्त त्यासाठी आपला वेळ खर्ची घालावा लागतो. मी माझ्या जीवनात एक तरी झाड लावले आहे का ? असा प्रश्न आपण स्वतःला विचारा. प्रश्न कडवट आहे आपल्याला प्रश्न ऐकून थोडासा रागही येईल परंतु सत्य व वास्तववादी आहे ! खरंतर वृक्षांची किंमत दुष्काळ पडल्यानंतर कळते, कडक अशा उन्हाळ्यात कळते, पिण्यासाठी पाणी मिळत नाही तेव्हा कळते, भर उन्हाळ्यात रण रणत्या उन्हात जेव्हा सूर्य आग ओकायला सुरुवात करतो. सारी तलाव, नद्या, धरण कोरड्या पडतात तेव्हा आपणा सर्वांना जाग येते. जेव्हा चिमणीलाही पिण्यासाठी पाणी मिळत नाही अरे! आपल्या धरतीवर, परिसरात, पर्यावरणात झाडेच कमी झालेली आहेत! आपल्याला झाडे लावली पाहिजेत व त्यांचा सांभाळ केला पाहिजे. नवीन वर्षात पुस्तकांची वाचन वेळ वाढवा google आणि मोबाईल या सगळ्या तांत्रिक गोष्टी तांत्रिक साधने झाली आहेत. परंतु पुस्तके ही सजीव माणसांनी त्यांना आलेले प्रत्यक्ष अनुभव मांडलेले असतात. वाचन केल्याने खरे ज्ञान, मूळ ज्ञान आपल्याला कळते. म्हणून वाचन वेड लावून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पुस्तकांना जपा, पुस्तकांना आपले मित्र माना, तंत्रज्ञान हे तंत्रज्ञान असते त्याचा फक्त उपयोग काम करण्यासाठी होतो. माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात या जाळ्यात फसू नका. माणसे माणसाला विसरत आहेत. माणसाला विसरू नका.

विज्ञान तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे परंतु तंत्रज्ञानात द्या, माया, माणुसकी, आपुलकी, प्रेम, आत्मीयता अशा भावभावना आपल्याला बघायला मिळत नाहीत ! किंवा आजी-आजोबांनी सांगितलेल्या प्रेमाच्या गोष्टी, संस्कारांच्या गोष्टी, आपल्याला मिळत नाहीत. कधी आपण रक्तदान केलंय का ? असाही प्रश्न स्वतःला विचारा. सर्वात मोठे दान महादान म्हणून रक्तदानाकडे पाहिले जाते. रक्तदान करा रक्तदान करणे सर्वात चांगले मोठे पुण्य लाभणारे दान आहे. अचानक आपण आजारी पडल्यानंतर आपल्याला रक्त कोण देणार ? का देणार ? आणि का द्यावे ? असे प्रश्न भविष्यात निर्माण होतात. हे आपण कोरोना महामारीच्या काळात सर्वत्र पाहिलेले आहे, अनुभवलेले आहे . म्हणून अशा गोष्टी करा ज्या तुमच्यासाठी हितकारक आहेत.

ज्या समाजासाठी हितकारक आहेत. ज्या देशासाठी हितकारक आहेत. नवीन वर्षात असाच संकल्प करा जेणेकरून देशाची प्रगती साध्य होईल.
————————————— माननीय संपादक व सर्व संपादक मंडळ तसेच सर्व वाचकांना व मान्यवरांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻🙏🏻 नूतन वर्षाभिनंदन !

देविदास पांचाळ सर सैनिक स्कूल, तुळजापूर. जिल्हा धाराशिव.

राष्ट्रीय गणित दिवस

राष्ट्रीय गणित दिवस

—————————————
गणित महोत्सव :
—————————————
दैनंदिन जीवनातील गणिताचे
————————————स्थान व महत्त्व
—————————————
मित्रांनो, आज राष्ट्रीय गणित दिन गणित तज्ञ श्रीनिवास रामा नुजन यांची जयंती. आज जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन! ते जगप्रसिद्ध गणित तज्ञ होते. गणिताचार्य होते त्यांनी संपूर्ण जगाला गणिताचे महान ज्ञान दिले, गणिता णितातील महत्त्वाची हजारो सूत्रे दिली गणित व मानवी जीवन याचा अतूट संबंध दाखवून दिला. रामानुजन यांना गणितामध्ये खूप आवड होती. त्यांच्या लहानपणापासून फक्त गणित! गणित!! आणि गणित!!! असाच अभ्यास करीत असत. आजही आपण त्यांनी तयार केलेल्या सूत्रानुसारच गणित सोडवतो. गणितातील या त्यांच्या महान कार्यामुळे त्यांच्या जयंती दिनी राष्ट्रीय गणित दिन साजरा केला जातो. त्यांच्या या महान कार्यचीआठवण म्हणून साधारणपणे 2012 पासून राष्ट्रीय गणित दिन साजरा केला जातो. गणित दिनाच्या सर्व गणित प्रेमींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा! आपल्या दैनंदिन जीवनात गणिताला खूप महत्त्वाचे स्थान आहे. ज्याप्रमाणे पंचपक्वान भोजनामध्ये मिठाचे महत्त्व असते अगदी असेच महत्त्व मानवी जीवनामध्ये गणिताचे असते. दैनंदिन जीवनामध्ये गणिताचे काय महत्त्व आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया गणित म्हटलं की आपल्या अंगावर काटा येतो! आपण एक सुविचार ही वाचला असेल” गणिताच्या जंगलात जायचे असेल तर सूत्रांची कुराड आपल्या हाती असली पाहिजे!” माणसाला कुठलंही गणित सोडवता येते कारण ते गणित सोडवण्यासाठी काही सूत्र असतात. ते सूत्र जर आपण यशस्वीरित्या पाठांतर केले आणि त्या सूत्रांचा योग्य वापर जर केला तर कसलेही गणित आपल्याला अवघड जात नाही. आपल्या बालपणीच्या आठवणी ताज्या करा! स्मरण करा आपण सर्वांनी पूर्वीपासून ऐकत आलेले आहोत की, गणित हा विषय सर्वांना खूप अवघड जातो. पण असे नव्हे. काही जणांना तो अवघड जातो.

परंतु बाकीच्या लोकांना तो अतिशय सोपा वाटतो. आठवा आपली शाळा, शाळेतील गणिताचे शिक्षक, वर्गातील गणिताचा तास आणि त्यांनी शिकवलेलं गणित! बापरे! त्यांचा धाक हा आपल्या जीवनाला वळण लावून गेला. माणसाच्या दैनंदिन जीवनात गणिताचे अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे. गणिताशिवाय आपले जीवन परिपूर्ण होऊच शकत नाही! शून्य म्हणजे गणित आणि आपल्या जीवनातून गणित वजा केले तर बाकी ही शून्य उरते! म्हणजेच बघा गणिताशिवाय आपले जीवन पूर्णच नाही. ज्याप्रमाणे एकट्या शून्याला काहीच महत्त्व नसते. किंमत नसते. जेव्हा आपण कोणत्याही संख्येच्या पुढे शून्य लावतो किंवा ठेवतो तेव्हा त्या संख्येची खरी किंमत कळते. गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क घेणारेही विद्यार्थी आहेत. आणि गणितामध्ये शून्य मार्क घेणारे ही विद्यार्थी आहेत. साधारणपणे बालवर्गापासूनच आपल्याला अंकाची ओळख होते. मुळाक्षरांची ओळख झाल्याबरोबर आपण अंकांकडे वळतो. प्रथम मुळाक्षरे, वर्णमाला, शब्द ओळखणे, बाराखडी पूर्ण झाल्यानंतर, पाहिल्यानंतर लगेच आपण या अंकांकडे वळतो. गणित लवकरात लवकर येण्याचा भक्कम पाया म्हणजे उजळणी पूर्णपणे येणे. पाढे पाठांतर करणे. ह्या सगळ्या घटना बालमनावर परिणाम करणाऱ्या असतात. या सर्व क्रिया प्राथमिक स्तरावरच्या आहेत हे सर्वांनी जाणून घेतले पाहिजे. पाया भक्कम असेल तर पुढील गणिताच्या अवघडात अवघड क्रियाही सोप्यात सोप्या वाटू लागतात. आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे, वर्गातील स्मार्ट बोर्ड आल्यामुळे गणित ही प्रक्रिया सोप्यात सोपी वाटू लागली आहे. लागते व विद्यार्थ्याला गणित विषयांमध्ये आवड निर्माण होते.

खरे तर प्राथमिक स्तरावरच्या शिक्षकांच्या गणित अध्यापनातील युक्त्या, प्रयुक्त्या प्रयोग, त्या सोप्या पद्धती, वेगवेगळी उदाहरणे, गणितातील त्यांचे छोटे छोटे उपक्रम, प्रकल्प यांची गोडी निर्माण करणे. पुस्तकाच्या चित्रांतील पक्षी असतील, वस्तू असतील, माणसं असतील, बस गाड्या असतील, झाडे असतील, चिमण्या पाखरे असतील, त्यांना मोजणे व अंकामध्ये लिहिणे ही जीवनातील गणिताची पहिली पायरी! जी आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहे. गणिताबद्दल लहानपणी मनात असलेली भीती ही आयुष्यभर भीती राहते! व त्यामुळे गणिताला नेहमी आपण भीत असतो. खरंतर जीवन म्हणजे गणितच आहे. आपल्या दररोजच्या व्यवहारात गणिताचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. जसे घरातील छोटे छोटे व्यवहार, भाजीपाला आणणे, दूध आणणे, किराणा सामान आणणे, कुटुंबासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करणे या छोट्या सगळ्या खरेदीमध्ये गणित सामावलेले आहे. साधा भाजीपाल्याचा हिशोब असेल, दुधाचा हिशोब असेल तो गणितानेच सोडवला जातो. गणितातील प्रक्रिया या विद्यार्थ्यांना सुरुवातीला अवघड जातात परंतु सरावाने त्या हळूहळू जमतात व अशा विद्यार्थ्यांना गणितामध्ये गोडी निर्माण होते. त्यांना गणिताची भीती राहत नाही जर गणित शिकवणारे शिक्षक प्राथमिक स्तरावर क्रियाशील असतील. वेगवेगळ्या उपक्रमांमधून वेगवेगळ्या खेळांमधून, शब्दकोड्या मधून गणित समजावून देत असतील तर हे अंकगणित मुलांच्या मनावर पक्के बिंबते व त्यांना पुढे गणिताची आवड निर्माण होते.

राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हाच आहे गणिताची ओळख सर्वसामान्यांना झाली पाहिजे सर्वसामान्य लोकांना गणिताचे महत्त्व कळावे दैनंदिन जीवनात गणिताचा वापर किती महत्त्वाचा आहे हे कळावे गणिताशिवाय मानवी जीवन कसे अधुरे आहे कसे शून्य आहे हे कळावे समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांना गणित विषयांमध्ये आवड निर्माण व्हावी व गणिताची भीती दूर व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय गणित दिन साजरा केला जातो हा या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे भविष्यात येणाऱ्या नवीन पिढीला गणितामध्ये आवड निर्माण व्हावी तसेच गणिताची भीती दूर व्हावी गणित सोपे वाटावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा व समाज जागृत करावा.

देविदास पांचाळ सर सैनिक स्कूल, तुळजापूर. जिल्हा धाराशिव.


आज विद्यालयात राष्ट्रीय गणित दिन अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त गणित महोत्सव गणितांचे विविध उपक्रम प्रकल्प यांचे आयोजन करण्यात आले होते.

सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत आवडीने गणिताचे वेगवेगळे प्रयोग तयार केले गणित एक्जीबिशन या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य श्रीमान घोडके सर यांनी केले तसेच याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक डॉक्टर पेटकर सर गणित विषयाचे शिक्षक श्रीमान सुनील चव्हाण सर श्रीमती पाटील मॅडम श्रीमती तोडकरी मॅडम श्री डी टी सावंत सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटू नये व गणित विषयात अधिक आवड निर्माण व्हावी हाच या पाठीमागचा उद्देश आहे

X